माननीय शालेय शिक्षणमंत्री विखे पाटीलजी,
गेल्याच आठवड्यात पेपरामध्ये तुमचे झक्कास फोटो झळकताना बघितले... मुंबईच्या बारावीच्या परीक्षाकेंद्रांवर म्हणे तुम्ही भेट दिलीत.. तिथल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी विचारुन घेतल्यात... कुठे शिक्षकांच्या जागी क्लार्क सुपरवायझिंग करत होते तर कुठे विद्यार्थ्यांना कोंदट वातावरणात पेपर द्यावे लागत होते... तुम्ही तिथे असे अचानक गेल्याने म्हणे तिथल्या कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आणि मुंबई बोर्डालाही चांगलाच धडा मिळाला...
हे तुम्ही एकदम छानच केलेत साहेब.. म्हणजे असे प्रत्यक्ष मंत्रीमहोदय असे एकदम येऊन धडकतात हे कळल्यावर बोर्डाचे कर्मचारी यानंतर अधिक जबाबदारीने वागतील अशी आशा आहे.. पण एक सुचवू का साहेब.. तुमचे टायमिंग जरी पर्फेक्ट असले तरी स्पॉट मात्र चुकलाच... मुंबईच्या केंद्रांना भेटी देण्यापेक्षा वाट वाकडी करून जरा लातूर, औरंगाबाद किंवा कॉपीसाठी प्रसिद्ध परीक्षाकेंद्रांना भेट दिली असतीत तर दरवर्षी परीक्षाकाळात चॅनेलांवर दिसणारा कॉपीचा नजारा तुम्हाला 'याची देही' पहायला मिळाला असता आणि चॅनेलांच्या कॅमेऱ्यालाही भीक न घालता कॉपी करणारे आणि ती पुरवणारे लोक साक्षात मंत्रीमहोदयांना समोर पाहून तरी बिचकतात का हे तरी आम्हाला कळले असते. खरं सांगू का... चॅनेलांवर कॉप्यांचे उठणारे मोहोळ पाहून आपण महाराष्ट्रातली दृश्य पाहतोय की बिहारमधली हे कळतच नाही... 'प्रगतीशील' असे आपण अभिमानाने ज्या राज्याचे वर्णन करतो त्या आपल्या महाराष्ट्राची 'प्रगती' कोणत्या दिशेने होते आहे याची एक जाणीव तुम्हाला या भेटीतून झाली असती..
अर्थात या केंद्रांवर फक्त कॉपीबहाद्दरच तुम्हाला भेटले असते असं नाही.. ऐन परीक्षेच्या काळात लोडशेडींगमुळे रात्रभर कंदीलाच्या प्रकाशात अभ्यास करणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांशीही तुमची ओळख झाली असती. कोर्टाच्या बडग्यामुळे परीक्षाकेंद्रांवर परीक्षा सुरू असताना जनरेटरची सोय करण्याचे आदेश तर शिक्षणखात्याने दिलेत... (अर्थात त्याचीही अंमलबजावणी कितपत होते हा प्रश्नच आहे.) पण साहेब वीजेची गरज फक्त पेपर लिहताना नसते हो.. वीजेची त्यापेक्षाही जास्त गरज असते ती परीक्षाकाळात अभ्यास करण्यासाठी.. कॉपी न करता अभ्यास करून परीक्षा देणाऱ्यांसाठी लोडशेडींगला तोंड देणे किती कठीण होत असेल याचीही कल्पना तुम्हाला आली असती... वीजपुरवठा हे तुमच्या अखत्यारीतली बाब नाही हे माहिती आहे आम्हाला.. पण शालेय शिक्षण खात्याचा मंत्री या नात्याने ज्या विद्यार्थ्यांच्या 'उज्ज्वल' भविष्यासाठी आपण मंत्रालयात बसून योजना आखता त्या सोळा-सतरा वर्षांच्या निरागस मुलांची कुतरओढ तरी तुम्हाला कळली असती हो..
या सगळ्या समस्यांना आपण जबाबदार आहात असे आम्हाला अजिबात म्हणायचे नाही. कारण हे सगळे वर्षानुवर्षे असेच चालत आले आहे. आपल्या परीक्षापद्धतीत मार्कांना असलेले अनन्यसाधारण महत्व आणि त्यातूनच घडणारे मास-कॉपीसारखे प्रकार हे आपल्याला नवे नाहीत. याआधी वर्षानुवर्षे पेपरमधून आपण हे सगळे वाचले आहे आणि चॅनेलमधून तर त्याचे इत्यभूंत दर्शन आपल्याला घडले आहे.. तुमच्या नशिबी तर औटघटकेचे राज्य आले आहे.. पण त्यातही तुम्ही बरेच काही करू शकता असे वाटल्यामुळे हा पत्रप्रपंच...
खरं तर साहेब.. विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायची इच्छा असेल तर कुठल्याच परीक्षाकेंद्रांना भेटी देण्याची गरजच नाही.. तिथे घडणारे गैरप्रकार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमे आहेतच.. तुम्ही केवळ आपल्या खात्याचा कारभार सुधारा... पर्सेंटाईल, ७०-३० यासारखे कोणतेही घोळ न घालता विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्या.. कॉपीविरोधी कायदे कडक करा... कॉपीसारख्या प्रकारांना स्थानिक राजकारणाचा असणारा उदार आश्रय असतो हे उघड गुपित आहे.. त्याचा बिमोड करायचा प्रयत्न करा.. सेण्ट्रलाईज अॅडमिशनसारख्या चांगल्या योजना लवकरात लवकर राबवण्याचा प्रयत्न करा... वाढीव जागांना वेळेवर परवानगी देऊन विद्यार्थ्यांवर प्रवेशाची टांगती तलवार दूर करा..
हे सगळे केलेत ना साहेब तर कोणतीही 'स्टंटबाजी' न करताही राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालक तुम्हाला दुवा देतील...
- कॉपी न करता पास झालेली एक विद्यार्थिनी.
Source - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4246726.cms
Thursday, May 7, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment