Tuesday, September 1, 2009

आखाडा

टांग टिंग टिंगा गं टांग टिंग टिंगा
घाल बाबा पिंगा रं घाल बाबा पिंगा
आला सप्टेंबर महिना
अन् ऑक्टोबरची तयारी झाली सुरू
वास्तवाच्या बोटभर फुग्यात आता
अपेक्षांची पोटभर हवा भरू
टम्म फुगलेल्या पैलवानांच्या गर्दीनं
समद्या राजकारणात झाला लै उकाडा
आन् मंडळी
येलाच म्हनत्यात,
हौशा, नवशा, गवशांचा राजकीय आखाडा !
सगळ्यांच्या मनी एकच भाव आता
ह्याला धरा अन त्याला टांगा..
टांग टिंगा टिंगा गं टांग टिंग टिंगा..
महाराष्ट्राचा राजकीय आखाडा
हाजीर हो ऽऽऽ
आले बघा, आले बघा, लगबग आले
आत्ता होते दहा, अन् आत्ता वीस झाले
काके आले, पुतणे आले
भाऊ भाऊ आले
आन् मिशीला तूप लावत
रांगेत उभे झाले
इलेक्शनची बस आली
प्रवाशांची दाटी झाली
सीटच्या पाठीवर पंच ठोकत
कण्डक्टर बोलला, तिकिऽऽऽ ट!
आणि सगळीकडून गलका झाला
हमको एक
मला एक
आम्हाला एक
तिकिट द्या, तिकिट द्या, तिकिट द्या !
कुणाला आल्या भोवळी
अन् कुणाला झिंगा
टांग टिंग टिंगा गं टांग टिंग टिंगा..
अशोकराव, विलासराव, नारायणराव आले
अन् एकमेकांना पाहून लालेलाल झाले
आबा आले हालत डुलत
पवारांचा हात धरून
भुजबळांचा फोन आला
‘निघालोच आहे घरून’
भोसल्यांनी पाठवलं
अजितदादांसाठी हेलिकॉप्टर
‘पवार स्कूल’च्या ताई म्हणाल्या
हा तर मोठाच चॅप्टर!
‘विदर्भ एक्स्प्रेस’ मधून उतरली
गडकऱ्यांची स्वारी
‘सकाळी’ म्हणत गोपीनाथराव
प्रकटले दुपारी
मुंडे बिचारे सहज म्हणाले
‘नितिनराव नवीन काय?’
पोटभर हसत गडकरी म्हणाले
‘प्रवीणचा आल्बम वाचतो हाय!’
जो तो म्हणतो मनामध्ये
ह्याला दाखवतोच इंगा
टांग टिंग टिंगा गं टांग टिंग टिंगा..
सातबाराचा उतारा घेऊन
आले उद्धवराव
अन् रामदास कदमांचं त्यांना
आठवेचना नाव
राजसाहेब बोटांवर
मोजत होते नंबर
कारण त्यांच्याकडे उमेदवार दहा
आणि जागा होत्या शंभर
रामदास आठवले म्हणाले
जोरात, ‘हमारीऽऽ एकताऽऽऽ ’
त्यांना दिली नाही कोणीच साद
तेव्हा अखेर ते स्वत:च
ओरडले, ‘जिंदाबाद!’
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भाव
‘माझ्याशी घेऊ नका पंगा’
टांग टिंग टिंगा गं टांग टिंग टिंगा..
लाल मातीचा आखाडा
पाणी मारून रेडी केला
आणि तोंडात शिट्टी धरून
मतदार राजा उभा केला
एक.. दोन.. तीन
चला, सुरू करा दंगा
टांग टिंग टिंगा गं टांग टिंग टिंगा..
घाल बाबा पिंगा रं घाल बाबा पिंगा..

source - http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=4444:2009-08-31-17-14-55&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104