एक वेगळी वैशिष्टय़पूर्ण कल्पना, चमकदार शब्द, आकर्षक मांडणी आणि योग्य नियोजनाने योग्य व्यासपीठावर समोर येणे या कोणतीही जाहिरात हीट होण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी असतात. अनेक वेळा हे सिद्ध झालंय. वेगळेपणा हा तर जाहिरातीचा आत्माच असतो. तुम्हीच सांगा ना, तुम्ही रोज शांपूच्या असंख्य वेगवेगळ्या जाहिराती पाहात असता. त्यातली एकही कदाचित तुमच्या लक्षात नसेल. याचं कारण केस चमकदार होणे, मजबूत होणे याशिवाय काही यूएसपी (युनिक सेलिंग पॉईंट) नसल्यामुळे केवळ स्पेशल इफेक्टस्वर काम भागवावे लागते.
पण तेच त्याऐवजी सुंदरशी एखादी कल्पना जर एखादं पात्र घेऊन पुढे आली, त्याला छान शब्द मिळाले तर ती कल्पना तात्काळ हीट होते. अमुलची ‘अटरली बटर्ली डिलिशियस’ म्हणणारी गाल फुगवून डोळे मोठे करून कायम आश्चर्यात असणारी चिमुरडी तर अजूनही अमुलच्या पॅकवर दिमाखाने विराजमान झालेली तुम्हाला दिसेल. त्याच्यासोबतचे चमकदार शब्दही आठवतात. आता अझरुद्दीन रिटायर झाल्यालासुद्धा काही वर्ष झाली. पण जेव्हा त्याने पदार्पणात लागोपाठ तीन टेस्टमध्ये शतकं काढली तेव्हा अमुलची कॅचलाईन होती ‘फ्यू मोअर सेंचुरीज वुईल मेक हीम हजारुद्दीन..’ किंवा जावेद मियाँदादने शारजाला शेवटच्या बॉलवर सिक्सर मारल्यावर कॅचलाईन होती ‘इस मियाँ को दाद दो..’ तुम्ही आठवायला बसलात तर तुम्हालाही खूप जुन्या जुन्या अमुलच्या कॅचलाईन्स आठवतील. हेच या जाहिरातींचे यश आहे. पण याच अमुलने गुलशन कुमार यांची हत्या झाल्यावर एक माणूस मरून पडलाय आणि कॅचलाईन फिल्मी शूटिंग अशी करून असंस्कृततेचीही खालची पातळीही गाठली होती.
काही काळापूर्वी व्होडाफोनचा पग फार प्रसिद्ध झाला. एक छोटीशी मुलगी.. तिचा एक छोटासा पग कुत्रा जो तिचा मदतनीस आहे, संरक्षक आहे, जो तिच्या मागेमागे सारखा फिरतो तो पाहणे खूपच विलोभनीय होतं. याच जाहिरातीत जर त्यांनी अक्राळविक्राळ अल्सेशियन किंवा डॉबरमॅन वापरला असता तर मला नाही वाटत ही जाहिरात इतकी हीट झाली असती. कारण लहान मुलीबरोबर लहानुला पगच शोभून दिसला. एखाद्या पाच वर्षांच्या मुलाने आपल्या बहिणीचं संरक्षण करावं तसं वाटलं. शिवाय पग या कुत्र्याच्या चेहऱ्यावर मुळातच इतके बापुडवाणे भाव असतात की त्याची तुलनाच होऊ शकत नाही. पाहिल्याबरोबर उचलून घ्यावा असा बिच्चारा तो दिसतो. लहान मुलगा आणि लोभस कुत्रा त्याबरोबर हॅपी टू हेल्प.. खूप दिवस ही जाहिरात चालत होती. गेल्या आयपीएल सीझनमध्ये ही जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती.
या आयपीएलमध्ये व्होडाफोनच्या जाहिराती तयार करणाऱ्या ‘ओ अॅण्ड एम’ या जाहिरात संस्थेने नवीन जाहिराती प्रदर्शित केल्या आहेत आणि त्यांना तात्काळ यश मिळालेलं आहे. पांढऱ्या कपडय़ातले अंडय़ासारखे डोके असलेले परग्रहावरचे वाटावे असे प्राणी.. वेगवेगळ्या सिच्युएशन आणि त्यासोबत व्होडाफोनच्या एका सेवेची जाहिरात.. आठवलं? त्या कॅरॅक्टरचं नाव आहे झुझू. झुझूचा डिक्शनरीतला अर्थ पाहिलात तर तो लाकडी कबूतर असा आहे. त्याचा काहीही संबंध इथे नाही.
या मालिकेमध्ये ३० वेगवेगळ्या जाहिराती केल्या गेल्या आहेत. त्यापैकी (हे लिहीत असताना) १३ प्रदर्शित झाल्या आहेत. रोज एक नवी जाहिरात अशी कल्पना करून आयपीएलचा संपूर्ण सीझन संपेपर्यंत या जाहिराती पुरवल्या जाणार आहेत. यातल्या जाहिराती किती आवडल्या असाव्यात लोकांना? तर यातली ब्युटी टीप्सची जाहिरात आठवतेय? एक झुझू एका बंद खोलीकडे जातो. मग काहीतरी पाहून किंचाळत परत येतो. मग दुसरा एक झुझू जातो, तोही किंचाळतो. एक लहान झुझू तर घाबरून फक्त आत डोकावून पाहतो. सगळेच किंचाळतात. कारण आत एक झुझू डोळ्यावर काकडीचे काप ठेवून शांत बसला आहे. त्यामुळे हे सगळे घाबरले आहेत. ही जाहिरात यू टय़ूबवर पहिल्याच आठवडय़ात लोकांनी तेरा हजार वेळा पाहिली. फेसबुकवर या झुझूचे ३५००० मित्र झाले आहेत.तुम्हाला जर असं वाटत असेल की, ही झुझू अॅनिमेटेड कार्टून कॅरेक्टर आहेत तर ते तसं नाहीय. पांढऱ्या वेषाच्या आत खरी माणसं आहेत. अचूक सांगायचं तर लहानखुऱ्या अशा सडपातळ बांध्याच्या बायका आहेत. या सगळ्या जाहिराती दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन येथे चित्रीत करण्यात आलेल्या आहेत. ही कार्टून कॅरेक्टर्स का नाही केली? कारण तशा जर या जाहिराती करायच्या झाल्या असत्या तर त्याचा खर्चही अपरिमित वाढला असता आणि मुख्य म्हणजे आयपीएल सामने सुरू होईपर्यंत त्या तयार झाल्या नसत्या.
‘ऑगिल्वी अॅण्ड मॅदर्स’ या कंपनीसाठी बंगलोरच्या निर्वाणा फिल्मसने प्रकाश वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली या तयार केल्या आहेत. एका महिन्यामध्ये ३० जाहिराती चित्रीत करायच्या असल्यामुळे लहान मुलांना घेऊन त्यांच्या कलाने जाहिराती करणे शक्य नव्हते. त्यामुळे लहानखुऱ्या पण मोठय़ा स्त्रियाच यासाठी वापरण्यात आल्या. या सगळ्या स्त्रिया तिथल्या रंगभूमीवर काम करणाऱ्या आहेत. चित्रणाच्या वेळी अनेक अडचणी आल्या. डोक्यावर ते अंडय़ासारखं बनावटी डोकं लावल्यावर त्या नटय़ांना काही दिसतच नसे. श्वास घ्यायलासुद्धा त्रास व्हायचा. सारख्या त्या ते डोकं बाजूला काढून श्वास घ्यायच्या. त्याच्याहून मोठी अडचण म्हणजे हे कलाकार वयाने आणि आकाराने दिसतात त्यापेक्षा मोठे असल्यामुळे त्यांना लहान दाखवण्यासाठी सेटस्चा आकार मोठा करण्यात आला. या झुझूंच्या चेहऱ्यावरचे जे मास्क आहेत ते पर्सपेक्स नावाच्या मटेरियलचे आहेत. त्याच्यावर जी एक्स्प्रेशन्स आहेत ती वरून चिकटवलेली आहेत. ती अॅनिमेट करता आली असती, पण त्यालाही खूप वेळ लागला असता. या सगळ्या जाहिराती चित्रीत करण्यासाठी फक्त तीन कोटी रुपये लागले आहेत.
व्होडाफोनने सहा महिन्यांपूर्वी ओ अॅण्ड एमला सांगितले होते की, अनकॉमन असे एखादे कॅरेक्टर आणि त्यांना जोडणारा एक कॉमन फॅक्टर असे घेऊन जाहिराती करायच्या आहेत. अनेक जाहिराती का? कारण एखाद दोन जाहिरातींना लोक लवकरच कंटाळतात आणि मग त्या पाहतच नाहीत. आता रोज नवीन जाहिरात म्हणजे लोक ती पाहणारच. बरं या कॅरेक्टरला झुझू हे नाव देण्यात आलं. कारण काहीतरी कॅची असं नाव पाहिजे होतं. अर्थात जाहिरातीमध्ये या नावाचा कुठे उल्लेखही नाहीय. पण तरीही याला नाव आहे.
इथे आणखी एक कल्पकता निर्मात्यांनी दाखवली आहेत. ज्या वेळी अॅनिमेटेड किंवा कार्टून कॅरेक्टर्स बनविली जातात, त्या वेळी त्यांच्या हालचाली जास्तीत जास्त माणसांसारख्या कशा होतील याचा विचार केला जातो. इथे मुळातच माणसं घेऊन शूटिंग करून त्यांना कार्टून कॅरेक्टर्स बनवायचं होतं. त्यामुळे त्यांनी दर सेकंदाला २० फ्रेम या स्पीडने कॅमेरा वापरला. साधारण टेलिव्हिजन कॅमेरा २५ फ्रेम दर सेकंदाला शूट करतो तर सिनेमाचा कॅमेरा २४ फ्रेम एक्स्पोज करतो. २० फ्रेमने शूट केलेली फिल्म जेव्हा २५ फ्रेमच्या गतीने दाखवली जाते. त्या वेळी कॅरेक्टर्सच्या हालचाली जास्त त्वरेने झाल्यात असं वाटतं. (आठवा फिल्म्स डिव्हिजनच्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या फिल्म्स. गांधीजी चालताहेत आणि हजारो लोक त्यांच्या मागे चालताहेत ही फिल्म तर मला आताही डोळ्यासमोर दिसतेय.) त्यामुळे ही माणसं खरी असूनही त्यांना कार्टूनचा फिल आला. पहिल्याच आठवडय़ात जवळपास २० कोटी लोकांनी या जाहिराती पाहिल्या. यापेक्षा एखादी जाहिरात हीट होण्याचा आणखी काय पुरावा पाहिजे? तुम्ही हे वाचाल तेव्हा झुझूच्या आणखी बऱ्याच नवीन जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. झुझू घराघरातले होऊन गेले असतील. मुद्दा फक्त एवढाच आहे की, जाहिराती हीट होतील. प्रत्येक जाहिरातीमध्ये असलेली कल्पना हीट होईल, पण त्यासोबत ज्याची जाहिरात करायची ते व्होडाफोनचे फिचर्स लक्षात राहतील का? मेख इथेच आहे. कारण कोणत्याही जाहिरातीचा मूळ हेतू प्रॉडक्ट विकणे आहे. वाहवा हा नाही. पाहू या.
asparanjape1@gmail.com
Source - http://loksatta.com/daily/20090507/viva08.htm
Thursday, May 7, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment