Thursday, May 7, 2009

‘विण्डोज इज शटिंग डाऊन’

‘विण्डोज इज शटिंग डाऊन’ हे वाक्य कॉम्प्युटरवर आपण रोज पाहतो. इंग्रजी व्याकरणदृष्टय़ा चुकीचं असलं तरी कॉम्प्युटर बंद होईपर्यंत हे वाक्य डोळ्यासमोर तरळवत ठेवतो. पण मनातल्या असंख्य विण्डोज सताड उघडय़ा ठेवून आपण नाइलाजानेच ‘विण्डोज’ नामक ऑपरेटिंग सिस्टिम शट डाऊन करत असतो.
‘विण्डोज’..
‘खिडक्या’..
आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग.
जगाचा झरोका.
एका ओ.एस.ला ‘विण्डोज’ असं नाव देण्याचं बिल गेट्सला सुचण्याचा नेमका कल्पक क्षण कोणता असेल? जगाचं भान देणाऱ्या खिडक्या उघडून देणारी संगणकप्रणाली. म्हणून ती ‘विण्डोज’!
खिडक्याच खिडक्या.. बिन उंबऱ्याच्या..
जगाचं भान देताना मर्यादा न ओलांडण्याचं भान देणाऱ्या बंदिस्त चौकटीच्या खिडक्या.
गोलपिठा या नाटकात खिडकीत उभं राहणाऱ्या तरुण मुलीला दरडावणारी आई दाखवलीय. ही आई प्रातिनिधिक. आजही अनेक आया खिडकीत उभ्या राहणाऱ्या आपल्या वयात आलेल्या मुलीला दरडावत असतील. ही खिडकीत उभं राहण्याची सवय मुलीला दाराबाहेर घेऊन जाते, या समजाचा पगडा गिरणगावातल्या गृहिणींवर अजूनही खासच.

पण खिडकीशी काही नातं जोपासणाऱ्या व्यक्ती प्रत्येक घरात असतात. पण घराबाहेरच्या व्यक्तींचंही विशिष्ट खिडकीशी नातं असतंच. आमच्या कॉलनीतल्या मैदानातला हिमांशू हिटर प्रत्येक बॉल खेळल्यानंतर ‘ए’ बिल्डिंगच्या ‘त्या’ खिडकीकडे बघायचाच. इतकी ती खिडकी त्याच्या नजरेची मालकीण झाली होती.
आपल्या नजरेला गुलाम करणाऱ्या खिडक्या आपल्या साऱ्यांच्याच आयुष्यात येतात. पण आपण स्वत:हून ही नजरेची गुलामी पत्करतो ते विण्डो शॉपिंगच्या वेळी.

मॉल संस्कृती बोकाळली नव्हती तेव्हा या खिडकी खरेदीची हौस बाळगणाऱ्या काही पिढय़ांचा मी प्रतिनिधी. चकचकीत दुकानांच्या काचेला नाक लावून डोळे फाडून आतल्या वस्तू बघायची ही हौस. पण केवळ हौसच. आतल्या वस्तू आपल्यासाठी नाहीतच हा संस्कार कुठून तरी मनात चोरपावलांनी शिरला आणि त्या विचाराने स्वत:साठी राजरस्ता करून ठेवला.

पण खिडक्या जमवण्याचा हा हौशी छंद काही सुटला नाही. जत्रेतल्या बाजारातून ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉलपर्यंत फिरस्ती झाली. जत्रा असो वा मॉल नाकाला ती काच अदृश्य स्वरूपात चिकटून राहिली. पण त्या काचेपल्याडच्या गोष्टींकडे पाहून हरखून जाण्याचं वय काही संपलं नाही. ते संपतही नाही.

एक ज्येष्ठ पत्रकार सहकारी सिंगापूरच्या एका मोठय़ा इलेक्ट्रॉनिक मॉलमध्ये गेले होते. चांगलं अडीच तास फिरूनही हे सद्गृहस्थ एकही वस्तू न घेता आणि एकही डॉलर खर्च न करता बाहेर आले. ही त्या मॉलसाठी ऐतिहासिक घटना होती. विमोचनाच्या दिवसापासून ज्येष्ठ मित्रांच्या भेटीपर्यंत या मॉलमध्ये शिरलेली व्यक्ती हात हलवत परत येण्याची ही एकमेव घटना होती. साहजिकच मॉलच्या व्यवस्थापनाचे प्रतिनिधी धावत धावत त्यांच्या भेटीला आले. अर्थातच आविर्भाव असा होता की आमचं काही चुकलं का, आमच्या काही त्रुटी राहिल्यात का, तुम्हाला काहीच खरेदी करावंसं वाटलं नाही का, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर झाली.बिच्चारं मॉल व्यवस्थापन. त्यांना आमच्या ज्येष्ठ मित्राने खरेदी केलेल्या खिडक्या दिसल्याच नसाव्यात.

पण मॉलपेक्षाही खरी मजा असते ती मनीष मार्केट किंवा त्याच्या आसपासच्या इम्पोर्टेड वस्तूंच्या रस्ते बाजारात फेरफटका मारण्यात. तिथे स्वत:ला प्रवाहपतित करून गर्दीत सोडून द्यायचं. निरुद्देश गल्ल्यांमध्ये पावसाळ्यातल्या कागदी होडीसारखं तरंगत राहायचं. एक वेगळीच दुनिया तिथे वसल्याचं लक्षात येतं.
लॅमिंग्टन रोडवरचा इलेक्ट्रॉनिक्स बाजार तर हुकमी टाइमपास. मात्र तिथे तुम्ही जरा टेक्नोसॅव्ही असल्याचं नाटक करावं लागतं. निरुद्देश भटक्याला तसा या बाजारात वाव नाही.

मात्र तिथे विण्डोशॉपिंगची पुढची स्टेप आहे. ‘एक्स्प्लोअर’ नावाचं विण्डो शॉपिंगचं एक दुकानच आहे. या एक्स्प्लोअरमध्ये नेहमीच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं प्रदर्शन असतं. एरव्ही बाहेर काचेची भिंत असते. ती इथे काढून टाकलेली. मात्र इथली वस्तू विकत घेता येत नाही. ती हात लावून पाहता येते. आजमावता येते. इतर वस्तूंशी तिची तुलना करता येते. मनसोक्त कितीही वेळ तुम्ही इथे विण्डो ओलांडून विण्डोशॉपिंग करू शकता. वस्तू खरेदी करायची झाल्यास मात्र इथे तुम्हाला रिटेल मार्केटमधले अनेक पर्याय दिले जातात. पण विण्डोशॉपिंगचं दुकान ही कन्सेप्ट मात्र आपल्याला आवडून जाते.

लोकप्रभातलं ‘ग्लिटरिंग गिझमोज’ हे सदर असंच विण्डोशॉपिंगचं एक मुद्रण रूप. यातल्या वस्तू खरं तर काचेला नाक लावून बघाव्याशा. तंत्रज्ञानाचं बदलतं रूप दाखवणाऱ्या. उपयुक्ततेची नवी समीकरणं मांडणाऱ्या. त्या वस्तू काहीवेळा ग्रे मार्केटमध्ये मिळूनही जातात. लोकप्रभाच्या वाचकांचे या वस्तू कुठे मिळतात म्हणून तुफान फोन येतात. काही वेळा प्रमोशनल अ‍ॅक्टिव्हिटीसाठी काही कंपन्या अशा वस्तू तयार करतात. काहीवेळा काही वेबसाइटवरही या अलिबाबाच्या गुहेतल्या वाटणाऱ्या वस्तू असतात. मात्र वेबसाइटवरची खरेदी तशी अजूनही आपल्याकडे सेफ नाही. वाचकांना अशा रिस्क नको, म्हणून ते संदर्भ न छापण्याकडे आमचा कटाक्ष. तरीही एक वाचक चिवट निघाला. फोनवरून पाठपुरावा करून त्या वेबसाइटचाही रेफरन्स द्याच म्हणाला. पठ्ठय़ा खरं तर विण्डोशॉपिंगवालाच, पण कधी कधी छंदाचंही मोल द्यावं लागतंचना. अर्थात वेबसाइट आल्या तरी आजही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानाचा चकचकाट मोहवून घेतो. एलसीडी टीव्हीच्या फ्रेम्स बघणं हा अपरिमित आनंद. किमतींकडे नजर जातेच. काहीवेळी या किमती आपल्या टप्प्यातल्या असल्याचे भासही भेलकांडवून जातात.
खूप नवनवीन गोष्टी नव्यानं आदळत राहतात. एका गोष्टीची (पाहण्याची) सवय होतेय न होतेय तोच तिसऱ्या-चौथ्या गोष्टी येत राहतात.

निकोलस नेगरपॉण्ट नावाचे एमआयटीचे टेक्नोगुरू एकदा मुंबईत आले होते. त्यांनी सांगितलं होतं की तंत्रज्ञानाचा झपाटा विलक्षण आहे. ते आत्मसात करण्यात जो समाज अपयशी ठरेल तो येत्या काळात पाल्यापाचोळ्यासारखा उडून जाईल. आमच्या पुढची पिढी लकीज् म्हणवली जाते. त्यांना आयटीची फळं चाखता आली. त्यांच्यासाठी तंत्रज्ञान हात जोडून उभं राहिलं. पण खिडक्या आशाळभूतपणे पाहणारी आमची पिढी तशी काही पाचोळ्यासारखी उडून गेली नाही. खिडकीच्या मर्यादेच्या आत पंख फैलावता आले नाही तरी काही प्रमाणात सुरक्षितताही मिळते.
मंदीने आणलेल्या ले-ऑफच्या वावटळीत आमच्या लकीज्च्या पिढीचे बाशिंदे हेलपाटून जाताना दिसतायत. काचेच्या पलिकडचं चित्रं थोडं विस्कटताना दिसतंय.

नव्या जगाचे नवे उंबरठे पाहताना आपल्याच खिडक्या रुंदावल्यासारख्या दिसतात. प्रत्यक्षात ती पीप-होल्सच असतात का?

paraglpatil@gmail.com

Source - http://loksatta.com/lokprabha/20090508/mind.htm


No comments: