तर सुरुवात झाली ती स्वयंपाकघरातला नळ किंचित ठिबकण्यापासून. सकाळपासून टप्.. टप्.. टप्.. करत तो अश्रू ढाळायला लागला आणि दुपारी त्याच्याकडे बघणं अपरिहार्य झालं. अर्थात बघणं म्हणजे त्याच्याकडे नीट बघू शकेल अशा व्यक्तीला बोलावणं. काकूंनी गॅलरीतून ओणवून सोसायटीच्या वॉचमनच्या नावे पुकारा केला. काकांनी माहितीतले दोन-तीन फोन नंबर फिरवले. बऱ्याच खटाटोपानंतर एक ‘माईचा लाल’ फोनवर भेटला. पंधरा मिनिटांत नळदुरुस्तीसाठी हजर होतो, म्हणाला. पण तो दोन-तीन तास फिरकलाच नाही. तेवढय़ा काळात काका-काकू येरझारा घालून दमले. आपले रोजचे कार्यक्रम होऊ शकले नाहीत म्हणून एकमेकांवर डाफरले. ‘तूच घरातले नळ नको इतके पिळून पिळून वायसर घालवतेस.’ ‘तुम्हाला दिवसात शंभरदा नळ उघडायला लागतो कशाला?’ वगैरे वादावादी झाली आणि शेवटी ‘तो’ येणार नाही, असं नक्की धरून काकूंनी रात्रीचं जेवण पुढय़ात घेतलं- न घेतलं तोच प्लंबर महाराज हजर झाले. दोन्ही हात खिशात घालून, नुसतं नळाकडे बघून, मान हलवत ‘नुसता वायसर बदलून चालणार नाही, आख्खा नळ बदली करायला लागेल,’ या निदानाला पठ्ठय़ाला पाच मिनिटंसुद्धा लागली नाहीत. आता रात्री आठनंतर नवी नळखरेदी कशी व्हायची? साहजिकच उद्याचा वायदा पडला. त्यातल्या त्यात काहीबाही बांधून, कोंबून नळाचं वासलेलं तोंड त्यानं थोडंफार मिटल्यासारखं केलं. म्हणजे टप्टप्, ठिपठिप थांबून झरझर सुरू झाली. निदान दोघांना रात्रीची झोप तरी विनाव्यत्यय मिळाली.
दुसऱ्या दिवसापासून एक मोठंच चक्र सुरू झालं. काका-काकू आणि त्यांचं घर हे सगळं सारखंच जुनंपुराणं होतं. त्यामुळे सगळेच सारखे निमित्ताला टेकलेले होते. नळ बदली करताना आणखी काय काय बदलायला लागेल, याबाबत कल्पनाशक्ती थिटी पडावी अशी एकेक शुक्लकाष्ठं मागे लागली. मुळामध्ये पहिल्या भिडूनं नळ बदलायलाच चार दिवस लावले. पहिल्या दिवशी तो आला नाही. दुसऱ्या दिवशी तो हात हलवत आला. तिसऱ्या दिवशी त्याने आणलेला नळ चुकीचा निघाला. चौथ्या दिवशी तो आहे, योग्य तो नळ आहे, जरूर ती हत्यारं आहेत, त्याचा काम करायचा मूड आहे, असा मणिकांचनयोग जुळल्यावर एकदाची नळाची प्रतिष्ठापना होऊन गळती थांबली. पण तोवर वरचा पाईप गळायला लागला होता. कारण ठोकाठोकीत कुठेतरी नको त्या ठिकाणी घाव बसला होता. मग वरच्या झिजलेल्या पाईपनं मान टाकली. त्याच्या वर्षांवात गिझरचा वीजपुरवठा आल्याने तेवढय़ात कुठेतरी शॉक बसायला लागला. असा सार्वत्रिक गोंधळ माजला.
एका प्लंबरचा धावा कमी होता म्हणून गवंडी, सुतार, इलेक्ट्रिशियन इत्यादींचे पाय धरणं आलं. काका-काकू हैराण झाले. कोण केव्हा येईल, कोण कोणतं काम कुठवर करेल, कधी गायब होईल, पुन्हा कधी दर्शन देईल, किती पैसे मागेल, या कशाला काही धरबंध राहिला नाही. सार्वत्रिक रखडपट्टी आणि त्यातून चिडचिड सुरू राहिली. सुमारे दहा-बारा दिवसांनंतर हे दुरुस्ती-नाटय़ संपलं. म्हणजे झाली तेवढी दुरुस्ती पुरे, असं समजून काका-काकूंनी ते आपल्यापुरतं संपवलं.
खूप दिवसांनंतर त्यांच्या नेहमीच्या वृद्धसभेत ते दोघे गेले असताना यावरूनच बोलणी निघाली. सर्वापाशी समांतर अनुभवांचा खजिना होता. या काका-काकूंना उगाचच वाटत होतं- आपलं काम छोटं, क्षुल्लक होतं, किरकोळ पैशांचं होतं म्हणून आबाळ झाली, वगैरे. अमेरिकेतल्या मुलाच्या पैशानं गावात आलिशान फ्लॅट खरेदी करणाऱ्या दुसऱ्या एका काका-काकूंकडे तितकेच बेपर्वाईचे अनुभव होते. सर्वाच्या बोलण्या-बोलण्यातून प्रश्नांची एक प्रचंड मोठी मालिका तयार झाली. उदाहरणार्थ- आपल्याकडे आताशा कामांना माणसं का मिळत नाहीत? चुकूनमाकून मिळालेली माणसं दिलेली वेळ, दिलेला शब्द का पाळत नाहीत? कामाला येताना स्वत:ला लागणारी हत्यारं, आयुधं स्वत:बरोबर व्यवस्थित आणत का नाहीत? घरं चालवणाऱ्यांनी घरात यंत्रांबरोबर त्यांचे स्पेअर्स, बटणं, वायरी, स्क्रू, पाने, स्प्रिंगा, बुशेस वगैरे कायमचे बाळगले असतील, असं ते का मानतात? त्यांचे स्वत:जवळचे सुटे भाग ते नेहमी अगोदरच्या कामावर का विसरून येतात? एक दोष दूर करताना नवा दोष किंवा समस्या का निर्माण करून ठेवतात? कोणत्या कामाचे किती पैसे आकारायचे, हे त्यांनी निश्चित केलेलं असतं का? की ते ‘माणसं बघून’ दर आकारतात? काम अपुरं ठेवणं, नीट न करणं, चुकीचं करणं, केलेली दुरुस्ती अल्पकाळ टिकणं, याबद्दल त्यांना किंचितही अपराधी कसं वाटत नाही? ज्याच्या यंत्राचं काम आपण करून देतोय, तो (किंवा ती) अर्धवट आहे किंवा ठार वेडा आहे, असं ते कसं धरून चालतात? आणि तो (किंवा ती) महाभाग तसा नसेल तर त्यांना खात्रीने वेड लावण्याइतपत कर्तृत्व ते कसं गाजवतात? आपल्याला या कामाची आणि त्यातून मिळणाऱ्या चार चव्वलांची काडीमात्र गरज नाहीये, असं ते का दाखवतात? आपल्या देशात कोणालाही पैशाची गरज नाहीये, असं मानलं तर मग इतकी गरिबी का? अन् कोणालाही कामाची गरज नाहीये, असं मानलं तर मग इतकी बेकारी कशी? किरकोळ मोबदल्याच्या छोटय़ा-मोठय़ा कामांना माणसं मिळत नाहीत असं मानलं, तरी मग मोठमोठय़ा कामांचेही असेच राडे का होतात? लक्षावधी रुपयांच्या चुराडय़ातून उभा राहिलेला नवाकोरा फ्लॅट वापरतानाही पावला-पावलाला ठेचा का लागतात? साधी दरवाजाची वरची कडी म्हणजे ‘टॉवर बोल्ट’ बसवतानाही बहुतेक वेळा कडीपेक्षा वरचा गाळा एक-दोन दोरीने तरी फटकून का असतो? जिन्याची एखादी पायरी तिरकी, ओटय़ाचा एखादा कोपरा अंमळ आत वळलेला, गिझरचा नळ ‘हॉट’-‘गरम’ या खुणेवर सरकवला की आतून थंड पाणीच येणार, अशा गफलती का? त्या करणारी किंवा हातून झाल्याचं मान्य करणारी एकच व्यक्ती किंवा एकच एजन्सी कधीच का नसते? प्रत्येकाला त्याबद्दल टोलवण्याचं दुसरं भरवशाचं ठिकाण नेहमीच कसं उपलब्ध असतं? ज्यानं त्यानं पुढे सरकवलेला हा चेंडू शेवटी कुठे थांबणार असतो? की नसतोच? चेंडू पुढे ढकलण्याचा असा ‘राष्ट्रीय खेळ’ आपण कुठवर खेळणार? टोळक्याने असे असंख्य प्रश्न उभे केले. त्या प्रश्नांनी त्यांना वेळोवेळी आडवं केलेलं होतं! घसे साफ केल्याने सर्वाना जरा बरं वाटलं, इतकंच.
पुढे कधीतरी हॉस्टेलची मेस बंद होती म्हणून दोन दिवस घरी राहायला आलेल्या तरुण नातवाजवळ काका-काकू तावातावाने यातलं काही सांगायला गेले तेव्हा त्यानं निम्म्यातच संवाद आवरता घेतला.‘पण तुम्ही जुन्यापान्या गोष्टी रिपेअर करायला जाताच कशाला? थ्रो अवे. नवीन घ्या ना, हवं ते. बाकी आपल्याकडे हे असंच चालायचं, हे काय मी तुम्हाला सांगू?’
आपले प्रश्न भयंकर होते, की ‘हे असंच चालायचं!’ हे त्यांच्यावर टाकलेलं पांघरुण भयंकर होतं, हे बिचाऱ्या काका-काकूंना अजून समजत नाहीये.
मंगला गोडबोले.
mangalagodbole@gmail.com
Source - http://www.loksatta.com/daily/20090228/ch02.htm
No comments:
Post a Comment