Wednesday, February 25, 2009

हे की ते


‘सो नू, आता उठणार की अजून थोडा वेळ झोपणार आहेस?’’ ममानं सोनूला विचारलं. त्यानं गादीतच थोडे आळोखेपिळोखे दिले. पाच मिनिटांनी उठण्याचं आश्वासन दिलं, पण अध्र्या तासानं उठला, ममानंही त्याकडे दुर्लक्ष केलं. तसेही ते लोक रजेवरच होते. थोडा वेळ इकडेतिकडे झाला, म्हणून काय फरक पडतो?
‘‘सोनुडय़ा, आधी ब्रश करतोस, की
आधी टॉयलेटला जाऊन येतोस?’’ मम्मानं
पुन्हा विचारलं. सोनूनं त्यातलं एक सांगितलं.
दुसरंच केलं, पण मम्माचं त्या वेळी
पुढच्या गोष्टीकडे लक्ष गेलेलं होतं.
स्वयंपाकघरातल्या ओटय़ाकडे जाताना
विचारलं,
‘‘राजू, तुला कॉफी हवी की
बोर्नव्हिटा?’’
‘‘आज बोर्नव्हिटा.’’
‘‘चालेल. किती शहाणा ग माझा
राजुडय़ा, पण राजुडय़ा तुला बोर्नव्हिटा गरम
हवा का कोमट?’’
‘‘थोडा गरम.’’
‘‘चालेल, पण कपमध्ये हवा का मगमध्ये
हवा?’’
‘‘मगमध्ये.’’
‘‘कोणता मग घेऊ या? कान असलेला
की स्ट्रॉ असलेला.’’
‘‘स्ट्रॉवाला नको मम्मा. त्यातून दूध
यायला वेळ लागतो. मग तूच रागवतेस.’’
‘‘नाही हं रागवणार. मी माझ्या पपुडय़ाला
रागवेन का कधी? आज तो अ‍ॅपलच्या चित्राचा
मग देते हं.’’
‘‘तो नक्को. तो मिकी माऊसवाला दे.’’
‘‘त्याच्यात काहीतरी ठेवलंय रे पप्या.’’
‘‘मग ते काढून दे.’’
‘‘आपल्याला लवकर बाहेर जायचंय ना?
मग मम्माला कामं कशाला करायला
लावतोस?’’
‘‘आँऽ.. अशानं मला दूधच नको.’’
‘‘असं करू नये. तू गुड बॉय आहेस
ना?.. बरं एक सांग. आज आपण आधी
शॉपिंगला जाऊ या का पार्कमध्ये जाऊ या?’’
‘‘आधी शॉपिंगला.’’
‘‘मग बागेत जायला उशीर होईल बाळा.
उन्हं लागतील तुलाच.’’
‘‘मग आपण हॅट घेऊ या, नवी नवी.’’
‘‘कोणती टोपी घेऊ या? अशी गोलगोल,
किनार असलेली की अशी पुढे उन्हासाठी
तिरपा पुठ्ठा असलेली?’’
‘‘माऽलाऽ काऊबॉय हॅट हवी..’’
‘‘माहिती नाही रे, इथे तशी कुठे मिळते,
मुळात मिळते की नाही?..’’
‘‘मग तू शोध. मला तशीच हॅट हवी
म्हणजे हवी.’’
‘‘चालेल. आपण शोधू हं. दूध संपवलंस
की तयारीला लागू या. बरं, आज तू सकाळी
आंघोळ करणार की संध्याकाळी?’’
‘‘आज आंघोळीला बुट्टी.’’
‘‘एऽ लबाडाऽ ऑशं नै कलायचं.
आंघोळ करायचीच.’’
‘‘पण डोक्यावरून नाही. नुसती
खांद्यावरून. (इथे आंघोळ कशी करायची,
अशी की तशी, हे मम्मानं विचारलं नव्हतं, पण
त्या छोटुल्यानं आधीच आपला पर्याय सांगून
टाकलेला होता. हा छोटा बदल लक्षात घ्यावा
ही विनंती.)
‘‘चालेल, पण आंघोळीनंतर तू कोणते
कपडे घालणार?’’ यानंतर मला माहीत
नसलेल्या अनेक वस्त्रविशेषांची नावं मम्मानं
घेतली. ती वेडीवाकडी, चुकीची उद्धृत
करून मी स्वत:चा अडाणीपणा जाहीर करू
इच्छित नाही. मुद्दा एवढाच, की आंघोळीनंतर
अंग कुठल्या कपडय़ात कोंबायचं यावरून
तुंबळ चर्चा, मतभेदांची नोंद, मनधरणी वगैरे
झाली. शेवटी पपुडय़ानं त्याला हवं तेच वस्त्र
अंगाला लागू दिलं आणि एकदाची मायलेकरं
घराबाहेर पडली. अगदी जायच्या क्षणापर्यंत,
रिक्षानं जावं, की टॅक्सीनं जावं, शॉपिंग बॅग
हातात धरावी, की खांद्यावर घ्यावी, बूट
घालावेत, की चटकन चपला अडकवाव्यात
यावर दोघांचं मंथन सुरूच होतं आणि माझी
खात्री आहे, की पुढे बाजारात गेल्यावर तर ‘हे
की ते’ या प्रश्नाचं विश्वरूपदर्शन त्या
पोरटय़ाला घडलं असेल.
या ‘प्रश्नात्कारा’बद्दल अलीकडे मला
प्रश्न पडतात. हे खरं आहे की, ती पस्तिशीची
आई फक्त चार-सहा दिवसांसाठी माझ्याकडे
राहायला आली होती. तिनं त्या पाच-सहा
वर्षांच्या पोराला सारखं ‘हे की ते?’
विचारण्याचा मला काहीही त्रास नव्हता. मी
फक्त श्रोता होते. प्रेक्षक होते. माझं मत मला
कोणी विचारलं नव्हतं. स्वत:हून काही
सुचवावं, सुनवावं एवढा माझा हक्क नव्हता.
तरीही मन काही बाबी नोंदवतच होतं.
एक काळ होता जेव्हा ‘बाबा वाक्यं
प्रमाणम्’ असं मुलांना वाढवलं गेलं. आता
असा काळ आलेला आहे, की ज्यात
जगण्याच्या प्रत्येक क्षणी अंगठय़ाएवढय़ा
मुलांनाही विचारलं जातं. खाणं-पिणं, कपडा-
लत्ता, बूट-चपला, हिंडणं-फिरणं, खेळणं
यासारख्या प्रत्येक गोष्टीत मुलांची आवड
िनवड, पसंतीक्रम, कल वगैरे विचारले
जातात. अगदी दैनंदिनीच्या, नित्यकर्माच्या
गोष्टीबद्दलही ‘‘राजुडय़ा, आज तू हे करणार
की ते?’’ वगैरे चौकशी होते. त्यात वेळ जातो.
काही बाबतीत गोष्टी वाया जातात. क्षुल्लक
कामाचं अवडंबर माजतं. इत्यादी क्षुल्लक
व्यावहारिक बाबी दूर ठेवल्या, तरी मूळ
प्रश्न उरतोच. जगण्याच्या प्रत्येक
क्षणी इतके पर्याय, इतकं निवडीचं
स्वातंत्र्य द्यायला हवंय का?
त्यातून योग्य ती निवड करण्याची
समज किती मुलांमध्ये असते?
किती जणांमध्ये ती लवकरउ
िशरा येत असावी. मुलाच्या
मतानं किंवा कलानं घेण्याआधी
मुलामध्ये मत, कल कळण्याची
कुवत आहे की नाही हे
बघायला नको का? केवळ
मोठय़ा वयामुळे, जास्त
जीवनानुभवामुळे मुलापेक्षा त्याच्या आई-
वडिलांना बऱ्याच गोष्टी जास्त कळण्याची
शक्यता आहे की नाही? का तर्क,
कार्यकारणभाव यांचा बळी गेला तरी चालेल,
पण अपत्यांना पर्याय द्यायचेच अशी आताच्या
तरुण पालकांची भूमिका आहे? ‘हे की ते?’
असे पर्याय मुलांना कधीपासून द्यायचे,
कोणत्या बाबतीत द्यायचे, कोणत्या बाबींमध्ये
निश्चितपणे द्यायचे नाहीत, याच्या काही
मोजपट्टय़ा ठरवायला हव्यात की नकोत?
आमचं एकच मूल आहे, आमची ऐपत
आहे, आम्हाला परवडतंय ही काही या
प्रश्नांवरची खरी उत्तरं नाहीत. चार-पाच पोरं
वाढवणाऱ्या, आर्थिक अडचणीमधला आई-
बापांनाही मुलांना नाराज करण्याची हौस
नक्कीच नसणार. तरीही जगताना, असे ना
तसे, नाराजीचे क्षण सर्वाच्या वाटय़ाला येतात.
दर खेपेला आपलं मन जपलं जाईल,
आपल्यापुढे पर्याय आणि निवडीचं स्वातंत्र्य
राहील, अशा भ्रमात मुलांना ठेवणं तरी
कितपत बरोबर आह़े
वास्तवात प्रौढ जीवन बऱ्यापैकी क्रूर
असतं. ते व्यक्तीला तितकेसे पर्याय देत नाही.
कधी कधी तर काहीच पर्याय देत नाही. हे
वास्तव ही मुलं मोठी झाल्यावर कसं स्वीकारू
शकतील हा विचार मला कधी कधी अस्वस्थ
करतो खरा. शेवटी निवांत राहावं की अस्वस्थ
व्हावं, हा पर्याय माझ्यापुढे थोडाच कोणी
ठेवलाय?
मंगला गोडबोले
mangalagodbole@gmail.com

No comments: